*Current_Affairs*
*🔹धान्योत्पादनाचे उद्दिष्ट 27 कोटी टनांचे*
यंदाच्या आर्थिक वर्षात ( 2016 -17 साठी ) सरकारने 27 कोटी टन धान्योत्पादनाचे उद्दिष्ट ठरविले आहे . तसेच गहू आणि तांदळाप्रमाणेच येत्या काही वर्षांत डाळींच्या उत्पादनातही देश स्वावलंबी होईल , असा दावा कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी केला .
कृषी मंत्रालयाशी संबंधित संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली . लोकसभेचे चिंतामण वनगा , रोडमनल नागरह , जी . हरी , एम . बी. राजेश , संजय श्यामराव धोत्रे , डॉ . तापस मंडल आणि राज्यसभेचे डॉ . चंद्रपालसिंह यादव हे खासदार या वेळी उपस्थित होते. समितीने बीज प्रमाणीकरणाच्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त केली . कृषी मंत्रालयाने बीज प्रमाणीकरणावर बारकाईने लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात चांगल्या दर्जाचे संकरित बियाणे उपलब्ध करून दिले जावे , अशा सूचना या समितीने केल्या.
राधामोहनसिंह म्हणाले , की धान्योत्पादनाच्या तिसऱ्या अंदाजानुसार 2015 - 16 मध्ये एकूण धान्योत्पादन 25 .22 कोटी टन झाले . हे प्रमाण 2014 -15 मध्ये 25 .20 कोटी टनांपेक्षा थोडे अधिक होते . यंदाच्या वर्षात 27 कोटी टन धान्योत्पादनाचे लक्ष्य सरकारने ठरविले आहे . त्याचप्रमाणे खाद्यतेलाची गरज आणि दरवर्षी होणारी 1 .2 कोटी टन खाद्य तेलाची आयात पाहता सरकारने विशेष मोहीम राबबिली आहे . त्याअंतर्गत तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी खाद्यतेलांचे आयात शुल्क वाढविण्यात आले आहे .
कडधान्याच्या ; विशेषतः डाळींच्या वाढत्या मागणीबद्दल ते म्हणाले , की डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी 2013 -14 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत (एनएफएसएम ) 16 राज्यांमधील 468 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते . केंद्रात एनडीए सरकार आल्यानंतर या मोहिमेमध्ये 29 राज्यांमधील 638 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे . त्यात ईशान्य भारतातील राज्ये , डोंगराळ भागातील राज्ये , केरळ , गोवा यांसारखी किनारपट्टीवरील राज्येही त्यात सहभागी झाली आहेत. केंद्र सरकारने कडधान्योत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून , 2016 - 17 मध्ये "एनएफएसएम ' अंतर्गत दिल्या जाणाऱ्या एकूण 1700 कोटी रुपयांपैकी 1100 कोटी रुपयांची तरतूद कडधान्योत्पादन वाढविण्यासाठी केली आहे .
*#व्यक्तिविशेष*
*🔹तोच जोश . . . तोच ‘पेस ’*
चार वर्षांनंतर लिअँडर पेस वयाच्या अर्धशतकाच्या आणखी जवळ आलेला असेल. तरीही तो अजूनही नव्या उमेदीने , उत्साहाने खेळत आहे . लिअँडरचे अनेक समकालीन टेनिसपटू निवृत्त होऊन एक दशकापेक्षा अधिक काळ झाला आहे . लिअँडर कधी निवृत्त होईल हे भाकीत करणे कठीण असले , तरी वय आणि ऑलिंपिकची पात्रता गाठण्याचे आव्हान यामुळे बहुधा टोकियो ऑलिंपिकमध्ये त्याचा सहभाग नसेल , हा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. त्यामुळे सलग विक्रमी सातव्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होत असलेल्या ४३ वर्षीय लिअँडरची रिओ ही शेवटची ऑलिंपिक स्पर्धा ठरू शकते .
आंतरराष्ट्रीय हॉकीपटू वेस आणि बास्केटबॉलपटू जेनिफर यांचा हा मुलगा १९८५ मध्ये चेन्नई येथील ब्रिटानिया अमृतराज अकादमीत दाखल झाला आणि येथेच डेव्ह ओ मेरा यांनी हिऱ्याला सर्वप्रथम पैलू पाडले . १९९०मध्ये अमेरिकन ओपन आणि विंबल्डनच्या ज्युनिअर गटात विजेतेपद पटकावून त्याने आपली चमक दाखवली . अजूनही ही चमक कायम आहे . १९९१ पासून तो व्यावसायिक टेनिसमध्ये सहभागी होऊ लागला. १९९२ मध्ये बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये रमेश कृष्णनसोबत खेळताना लिअँडरने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली . चार वर्षांनंतर अटलांटात इतिहास घडला . मनगट दुखत असतानाही त्याने एकेरीत ब्राँझपदक जिंकले . खाशबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळविणारा लिअँडर पहिला भारतीय खेळाडू ठरला . २००४ च्या अथेन्स ऑलिंपिकमध्ये दुहेरीतील त्याचे ब्राँझपदक थोडक्यात हुकले. महेश भूपतीसोबत खेळताना ही जोडी ब्राँझपदकाच्या लढतीत पराभूत झाली.
लिअँडर आणि महेश भूपतीने भारताला डेव्हिस करंडकात अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले . ही जोडी त्यांच्या कामगिरीने जशी गाजली , तशीच वादग्रस्तपणे तुटली . ग्रॅंडस्लॅम जिंकणारा सर्वांत वयस्कर टेनिसपटू , एकाच वेळी विंबल्डनमध्ये पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी ( १९९९ ) अशी दुर्मिळ कामगिरी करणारा एकमेव टेनिसपटू , असे कितीतरी विक्रम लिअँडरच्या नावावर नोंदविले गेले आहेत. सहा ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेला तो पहिलाच टेनिसपटू होय . असा भारतीय क्रीडा क्षेत्राचा राजदूत रिओत रोहन बोपण्णासोबत दुहेरीत खेळेल .
लिअँडरच्या ऑलिंपिक कारकिर्दीची दिमाखात सांगता होवो , अशीच तमाम भारतीयांची इच्छा आहे .
लिअँडरची महत्त्वपूर्ण कामगिरी
ऑलिंपिक
एकेरी - अटलांटा ( १९९६ ) - ब्राँझ
राष्ट्रकुल - दिल्ली (२०१० ) - ब्राँझ
आशियाई क्रीडा -
१९९४ हिरोशिमा ( पुरुष दुहेरी व सांघिक -सुवर्ण , एकेरी - ब्राँझ ) ,
२००२ (बुसान - दुहेरी-सुवर्ण )
२००६ (दोहा - दुहेरी व मिश्र दुहेरी-सुवर्ण )
ग्रॅंड स्लॅम -
मिश्र दुहेरी - ३ ऑस्ट्रेलियन , ४ विंबल्डन , २ अमेरिकन , १ फ्रेच
दुहेरी - ३ फ्रेंच , ३ अमेरिकन , १ विंबल्डन , १ ऑस्ट्रेलियन .
पुरस्कार -
अर्जुन - १९९० ,
राजीव गांधी क्रीडा रत्न- १९९६ ,
पद्मश्री - २००१
पद्मभूषण : २०१४ .
___________________________
*🔹संसदीय कामकाज समितीतून स्मृती इराणी यांची हकालपट्टी*
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात केंद्रीय मंत्रिपदावरून वस्रोद्योग मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार देण्यात आलेल्या स्मृती इराणी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा धक्का दिला आहे. केंद्रीय मंत्रिपदापाठोपाठ इराणी यांची संसदीय कामकाज समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर मोदींनी सर्व सहा कॅबिनेट समित्यांची पुनर्रचना केली आहे. याआधी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून स्मृती इराणी यांचा समितीमध्ये समावेश होता. मात्र आता वस्त्रोउद्योग मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्री असून सुद्धा इराणी यांना सहापैकी एकाही कॅबिनेट समितीवर जागा मिळू शकली नाही. विशेष म्हणजे समितीवरील नव्या सदस्यांमध्ये स्वतंत्र कारभार असलेल्या एका मंत्र्यासह अन्य दोन राज्यमंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे.
*🔹'जीएसटी'साठी वाटाघाटी*
काँग्रेसच्या विरोधामुळे राज्यसभेत अडलेल्या बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकावर शुक्रवारी मोदी सरकार आणि काँग्रेसच्या नेत्यांदरम्यान 'सकारात्मक' प्राथमिक चर्चा झाली. मात्र, सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संमत होणार काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. या विधेयकावर सर्वसंमती घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्या संसद भवनातील कक्षात अर्थमंत्री अरुण जेटली आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी जीएसटी विधेयकाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याविषयी चर्चा केली. या चर्चेत राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्माही सहभागी झाले होते.
*🔹तुर्कीत लष्करी उठाव; १२० बंडखोरांना अटक*
आतातुर्क विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून सावरत असलेल्या तुर्कीला काल रात्री मोठा हादरा बसला. तुर्की लष्करातील एक गटानं शुक्रवारी मध्यरात्री देशातील लोकशाही सरकारविरोधात उठाव केला. बंडखोर सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४२ लोक ठार झाले आहेत. त्यात २०हून अधिक पोलिसांचा समावेश आहे. तुर्की पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर देत १२० बंडखोरांना अटक केली आहे. पोलीस व बंडखोरांमध्ये अजूनही धुमश्चक्री सुरूच आहे. मात्र, तुर्कीचे राष्ट्रपती इर्दोगन यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली आहे.
सरकारविरोधात उठाव करणाऱ्या बंडखोरांनी सर्वप्रथम आशियाला युरोपशी जोडणारा पूल बंद करून टाकला. त्यानंतर तुर्कीच्या विशेष पोलिसांच्या मुख्यालयावर हल्ला केला. त्यात १७ पोलिसांचा मृत्यू झाला. बंडखोरांनी संसदेलाही लक्ष्य केले. संसदेच्या वास्तूवर बॉम्बहल्ला केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच सरकारनं तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात जमावबंदी लागू करण्यात आली असून सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, तुर्की पोलिसांनी बंडखोरांना कडवी झुंज देत त्याचे एक हेलिकॉप्टर पाडले आहे. बंडखोरांना सामील असलेल्यांपैकी १२० जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी, देशातील लोकशाहीप्रेमी नागरिकांनी सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.
तुर्कीचे राष्ट्रपती इर्दोगन यांनी देशवासीयांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 'तुर्कीतील बंडाशी लष्करप्रमुखांचा काहीही संबंध नाही. काही मोजक्या लोकांनी हा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं असून १२० अटक करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमधून हल्ला करणाऱ्या बंडखोरांना संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत,' अशी माहिती इर्दोगन यांनी दिली.
*🔹' इसिस ' ला शह देण्यासाठी सोशल मीडियाचा*
मुस्लिम धर्मोपदेशक करत आहेत विचार
कोलकता - इसिस या दहशतवादी संघटनेचा देशातील प्रभाव कमी करण्यासाठी मुस्लिम धर्मोपदेशकांनी सोशल मीडियाचा वापर करण्याचा विचार सुरू केला आहे .
देशातील मुस्लिम समाजातील अनेक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून " इसिस ' च्या जाळ्यात अडकत असल्याचे समोर आले आहे . या पार्श्वभूमीवर मुस्लिम तरुणांमध्ये इस्लामविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मुस्लिम धर्मोपदेशकांनी सोशल मीडियाचा वापर करण्याचा विचार सुरू केला आहे . मुस्लिम तरुणांचे इसिस आणि इतर दहशतवादी संघटनांबद्दल वाढते आकर्षण कमी करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांना धडे देणार असल्याची माहिती बंगालचे इमाम फजलूर रेहमान यांनी शुक्रवारी दिली . यासंदर्भात अंतिम निर्णय अजून घेण्यात आलेला नसून बंगाली धर्मोपदेशक रेहमान इतर इस्लामी धर्मोपदेशकांशी चर्चा करत आहेत.
इसिस या संघटनेसह इतर दहशतवादी संघटना इस्लाम आणि कुराण चुकीच्या पद्धतीने तरुणाईसमोर मांडत असल्याचे रेहमान यांनी म्हटले आहे . या दहशतवादी संघटनांना ते वापर करत असलेल्या माध्यमातून सडेतोड उत्तर देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईला इस्लामचे धडे देण्यात येतील . तसेच दहशतवादी संघटना पसरवत असलेल्या चुकीच्या इस्लामी संकल्पनेला विरोध करण्यात येईल .
विविध भाषांतून इस्लाम समजविणार
स्लम तरुणाईचे इसिस आणि इतर दहशतवादी संघटनांविषयीचे आकर्षण कमी करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्लामचा अर्थ हिंदी , उर्दू, बंगाली , इंग्रजी भाषेतून समजाविण्याचा विचार सध्या सुरू आहे .
*🔹कोण आहेत तुर्कस्तानमधील फतेउल्लाह गुलेन ?*
तुर्कस्तानमध्ये लष्कराने सत्ता हाती घेत केलेल्या उठावामुळे निर्माण झालेल्या संघर्षात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला आहे . मृतांमध्ये 17 पोलिसांचा समावेश आहे . पंतप्रधान बिनाल यिल्दीरीम यांनी आपण नागरिकांसोबत असल्याचे म्हटले आहे . यिल्दीरीम यांनी अमेरिकन मुस्लिम मोलवी फतेउल्लाह गुलेन यांनी आपल्या अनुयायांसह उठाव केल्याचे म्हटले आहे .
फतेउल्लाह गुलेन यांच्याविषयी थोडक्यात -
गुलेन हे तुर्कस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावशाली नेते समजले जातात
75 वर्षीय गुलेन प्रकृतीच्या कारणांमुळे त्रस्त आहेत
मुस्लिम मौलवी गुलेन यांचे तुर्कस्तानमध्ये लाखो अनुयायी आहेत
दीडशेहून अधिक देशांत त्यांच्याकडून शाळा चालविण्यात येतात
कोट्यवधी डॉलरमध्ये यांचे व्यवहार आहेत
अमेरिकेतील पेनसिल्वव्हिनियामध्ये ते 90 च्या दशकात राहत होते
तुर्कस्तानमध्ये देशविरोधक कारवायांचा आरोप झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले होते
त्यानंतर त्यांना काही दिवसांतच आरोपमुक्त करण्यात आले
2014 मध्ये गुलेन यांनी तुर्कस्तान सरकारविरोधात कारवाईचे संकेत दिले होते
सध्याचे तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तयिप एर्दोगन यांचे कधीकाळी निकटवर्तीय असलेले गुलेन प्रतिस्पर्धी मानले जातात
तुर्कस्तानमध्ये पोलिस , न्यायपालिका आणि तपास यंत्रणांमध्ये गुलेन यांचा प्रभाव असलेले कर्मचारी आहेत
सध्याच्या लष्करी उठावात या समर्थकांचा प्रामुख्याने समावेश आहे
*🔹स्कॉटलंडबाबत पुन्हा सार्वमत नाही - ब्रिटन*
' ब्रेक्झिट ' च्या बाजूने ब्रिटनच्या जनतेने कौल दिल्यानंतर स्कॉटलंडने स्वातंत्र्याबाबत दुसऱ्यांदा सार्वमत घेऊ नये , असे ब्रिटनचे स्कॉटलंड मंत्री डेव्हिड मुंडेल यांनी आज स्पष्ट केले. युरोपीयन युनियनमधून बाहेर पडण्याबाबत घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये 52 : 48 या प्रमाणात मतदान झाले होते , तर स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याबाबत घेण्यात आलेल्या सार्वमतावेळी 62ः38 या प्रमाणात नागरिकांनी मतदान केले होते . ' स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा सार्वमत घेण्याचा प्रश्नच नाही . अशा प्रकारे पुन्हा सार्वमत घेण्यास माझा स्पष्ट विरोध असून , तो यापुढेही कायम राहील. स्कॉटलंडला ब्रिटनपासून अनेक फायदे मिळत आहेत,'' असे मुंडेल यांनी सांगितले .
*🔹औरंगाबादच्या युवकाची कंपनी ‘ई-बे’ने केली खरेदी!*
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन वयाच्या १८व्या वर्षी औरंगाबादच्या मुक्तक जोशी या तरुणाने स्थापन केलेली इव्हेन्ट तिकीट विक्री करणारी ‘टिकेट युटिल्स’ ही कंपनी ई-कॉमर्समधील अग्रगण्य असलेल्या अमेरिकेतील ‘ई बे’ कंपनीने खरेदी केली आहे.
मुक्तक जोशी याचे औरंगाबादेतील सरस्वती भुवन प्रशालेत मराठी
माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण झाले
आहे. देवगिरी महाविद्यालयातून बारावी केल्यानंतर त्याने एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. या काळातच त्याने सॉफ्टवेअर कंपन्यांचे ‘फ्री लान्सिंग काम करण्यास सुरुवात केली. २००५मध्ये बी. ई. कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण झाला. २००७मध्ये ‘टेक्नोप्रोटेन’ कंपनी स्थापन केली. त्यानंतर २०१२मध्ये ‘टिकेट युटिल्स’ची सुरुवात केली.
मुक्तकचे बंधू सत्यक जोशी आणि पत्नी श्रुती हे त्यांना कंपनीच्या कामात मदत करतात. त्याचे वडील शोधन जोशी हे शहरातील प्रसिद्ध बिल्डर आहेत.
अमेरिकेतील लास वेगास शहरात शुक्रवारी मुक्तकच्या ‘टिकेट युटिल्स’चा ‘ई-बे’शी करार झाला. मात्र, हा करार किती किमतीला झाला याची माहिती दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केलेली नाही. (प्रतिनिधी)
अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये होणाऱ्या मोठमोठ्या स्टेडियममध्ये आणि इनडोअर ठिकाणी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि विविध इव्हेंटची तिकिटे अनेक ब्रोकर गठ्ठा पद्धतीने (बल्क) खरेदी करतात आणि नंतर ती आॅनलाइन नागरिकांना विक्री करतात.
ग्राहकांपर्यंत आॅनलाइन तिकीट पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर ‘टिकेट युटिल्स’ने तयार केले असून, काही सेकंदांत लाखो लोकांपर्यंत ही तिकिटे पोहोचण्यास मदत होत आहे. तिकिटांची पुनर्विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले ‘पॉइंट आॅफ सेल’ असे हे उत्पादन ‘टिकेट युटिल्स’ने विकसित केले आहे.
कंपनीचे हे उपयुक्त सॉफ्टवेअर
पाहून या क्षेत्रात बडी कंपनी असलेल्या ‘ई बे’ने कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मुक्तकच्या कंपनीत औरंगाबाद, जालना, बीड आदी ठिकाणांहून आलेली तरुण मंडळी आहेत.
*🔹उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय*
मुंबई : रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी, यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे वायफाय सेवा सुरू करण्यात आली. मुंबई सेंट्रल स्थानकात ही सेवा सुरू झाल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या आणखी पंधरा उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून त्याला मंजुरी देण्यात आली असून १५ आॅगस्टपर्यंत सर्व स्थानकांवर वायफाय सेवा सुरू होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वे टेल आणि गुगलमार्फत वायफाय सुविधा पुरवण्यात येत आहे.
२0१८ पर्यंत देशभरातील एकूण ४00 स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील सुरुवातीला १00 स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वायफाय सेवा २0१६ पर्यंत देण्यात येणार आहे. वायफाय सुविधेचा पहिला मान हा मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळाला. या स्थानकात वायफाय सुविधा २0१६ च्या जानेवारी महिन्यात सुरू झाली. मात्र त्यानंतर अन्य स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळाला नाही. अखेर १५ उपनगरीय स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू करण्याच्या निर्णयाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
२१ एप्रिल २0१६ रोजी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत मुंबईतील काही स्थानकांवर १५ आॅगस्टपर्यंत वायफाय सेवा देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती.
*🔹लिएंडर पेसने साधली विश्वविक्रमाची बरोबरी*
भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसनं डेव्हिस चषकात बोपण्णाच्या साथीनं कोरियाविरुद्धच्या लढतीतील दुहेरी सामना जिंकला आहे. या विजयामुळे लिएंडर पेसनं डेव्हिस चषक पुरुष दुहेरीत इटलीच्या निकोला पित्रांगेलीच्या सर्वाधिक 42 विजयांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे. पेस आतापर्यंत भारतासाठी पुरुष दुहेरीत 53 सामने खेळला असून त्यात तो केवळ 11 वेळा पराभूत झालाय.
_____________________________________
No comments:
Post a Comment