२२ जून २०१६
जागतिक लोकसंख्येच्या 1 टक्के लोक निर्वासित
‘‘जागतिक निर्वासित दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2015 या वर्षाच्या अखेरीस 6.53 कोटी नागरिकांना घर सोडावे लागले. याचा अर्थ असा की जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 1 टक्के नागरिकांना जबरदस्तीने बेघर व्हावे लागत आहे. स्वदेशातील अशांतता, युद्धजन्य वातावरण व इतर काही कारणांमुळे इतर देशांमध्ये स्थलांतर करणार्या जगभरातील नागरिकांच्या संख्येने यंदा उच्चांक गाठला आहे. स्थलांतरितांच्या संख्येने प्रथमच 6 कोटींचा आकडा पार करून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
अफगाणिस्तान, इराक, सीरिया, येमेन, पॅलेस्टाईन येथील अशांत परिस्थितीमुळे मोठ्या संख्येने नागरिक युरोपमध्ये प्रवेश करत आहेत. बेघर झालेल्यांपैकी 60 टक्के नागरिक त्यांच्याच देशात इतरत्र आश्रय घेत असले तरी 40 टक्के नागरिक देशच सोडून जात आहेत.
या देशांमधील स्थिती अजूनही सुधारण्याची चिन्हे नसताना स्थलांतरितांमुळे त्यांना सामावून घेणार्या देशांमध्ये नवे प्रश्न निर्माण होत आहेत. या देशांमधील गुन्ह्यांमध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मानवतेच्या दृष्टिकोनातून बहुतेक देश स्थलांतरितांना आश्रय देत असले तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने समाजावर पडणार्या ताणामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ लागला आहे. जर्मनीमध्ये सर्वाधिक निर्वासितांनी आश्रय घेतला आहे. यामुळे या समस्येतून मार्ग काढण्यासाठी युरोपमधील देश एकत्र येत आहेत.
निर्वासितांची परिस्थिती -
* 7.34 अब्ज : जगाची लोकसंख्या
* 6.53 कोटी : निर्वासितांची संख्या
* 58 लाख : निर्वासितांमध्ये झालेली वाढ
* 49 लाख : सीरियामधील निर्वासित
* 27 लाख : अफगाणिस्तानमधील निर्वासित
* 11 लाख : सोमालियामधील निर्वासित
No comments:
Post a Comment